सहकार चळवळीचे आणि एकात्मिक ग्रामीण विकासाचे अध्वर्यु मा.खा.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन उद्या मंगळवार दि.१३ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १०.०० वा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते होणार आहे. मा.खा.डॉ. बाळासाहेब विखे पाटील हे दीर्घकाल संसदीय राजकारणात सक्रिय राहिले. १९६२ च्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदापासून ते त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत ते सतत समाजकारण, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, आरोग्य, कृषि, जलसिंचन, सहकार, महिला विकास, बेरोजगारी इत्यादी क्षेत्रात गुणात्मक परिवर्तनासाठी कार्यरत राहिले. संसदेत या संबंधी ते सतत प्रश्न उपस्थित करीत. केंदीय मंत्रीपदाच्या काळातही सरकार आणि प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख कसे राहील, यासाठी ते कायम प्रयत्नशील होते. त्याचे अनेक सकारात्मक परिणाम ग्रामीण आणि शहरी भागातही आपण सर्वानी अनुभवले आहेत. अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणुन हि ते सर्वपरिचित होतेच, याचबरोबरच समाजातील सर्व घटकांचे आधारस्तंभही होते. विविध क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव त्यांनी अखेरच्या काळामध्ये आपल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्रामध्ये शब्दबद्ध केले आहेत. या आत्मचरित्राचे प्रकाशन भारत देशाचे पंतप्रधान सम्माननीय नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते मंगळवार दि.१३ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १०.०० वा. होणार आहे.
|