राज्य शासनाच्या आदेशाने शिर्डी येथील श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले असून दिनांक १६ नोव्हेंबर ते दिनांक २७ नोव्हेंबर २०२० याकालावधीत ९१ हजार १३६ साईभक्तांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. तर याकाळात श्री साईप्रसादालयामध्ये सुमारे ०१ लाख १० हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली. कान्हूराज बगाटे म्हणाले, सध्या कोरोना विषाणु (कोवीड १९) ची साथ चालु असून कोरोना विषाणुच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने दिनांक १७ मार्च पासुन लॉकडाऊन करण्यात आलेले होते. राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक १६ नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. अजुन कोरोना विषाणुचे सावट संपले नसल्यामुळे श्रीं च्या दर्शनाकरीता सामाजिक अंतराचे पालन करुन ठरावीक संख्येनेच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे साईभक्तांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन बुकींग निश्चित करुनच शिर्डी येथे श्रीं च्या दर्शनाकरीता यावे. तसेच पालखी मंडळाचे पदाधिका-यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्याचे टाळावे असे आवाहन साईभक्तांना श्री साईबाबा संस्थानच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. दिनांक १६ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२० याकालावधीत ९१ हजार १३६ साईभक्तांनी ऑनलाईन, टाइम बेस व सशुल्क दर्शन पासेसच्या माध्यमातुन साईदर्शनाचा व श्री साईप्रसादालयामध्ये सुमारे ०१ लाख १० हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तसेच याकालावधीत संस्थानचे साईआश्रम भक्तनिवास, व्दारावती भक्तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्तनिवास्थान (५०० रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्थानांव्दारे २१ हजार १२४ साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे ही कान्हूराज बगाटे यांनी सांगितले. |