अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.) स्त्रीला संपत्ती मिळण्याचे मार्ग कमावती स्त्री स्वतः नोकरी-व्यवसायातून मिळवत असलेला पगार, तिला मिळणारे मानधन, व्यवसायात मिळणारा नफा, घरगुती वस्तु, कलाकुसरीच्या वस्तू, खाद्यपदार्थ ईत्यादी तयार करून त्यांच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न, वगैरे संपत्ती ही तिची स्वकष्टार्जित म्हणजेच स्वतः कमावलेली संपत्ती होय. मग अगदी कुटुंबाच्या पारंपारीक, सामायिक व्यवसायाला स्त्री हातभार लावत असेल तर तो ही तिच्या उत्पन्नाचा स्रोतच आहे. अशा एकत्रित व्यवसायात स्त्री देत असलेल्या हातभाराची दखल घेतली गेली पाहीजे. त्या व्यवसायातील उत्पन्नातून तिला स्वतःसाठी पैसे मागण्याचा हक्क आहे आणि ते उत्पन्न तिचे वैयक्तिक उत्पन्न अर्थातच तिची वैयक्तिक संपत्ती मानली जाईल. याशिवाय वाढदिवस, साखरपुडा, लग्न, लग्नानंतरचे पहिले बारा सण, लग्नाचा वाढदिवस, डोहाळेजेवण, बाळंतपण, बारसे,सण-समारंभ, गृहप्रवेश, इतरांचे विवाहसमारंभ अशा अनेक निमित्ताने बरेचदा स्त्रियांना मौल्यवान भेटवस्तू मिळतात. अशा कोणत्याही निमित्ताने माहेरच्या तसेच सासरच्या मंडळींनी तिला दिलेले दागिने हे तिच्या मालकीचे असतात. परिक्षेत चांगले गुण मिळाले, नवीन नोकरी मिळाली, नोकरीत बढती मिळाली, नोकरीतील निरोप समारंभ, निवृत्ती अशा निमित्तानेही स्त्रियांना सासर-माहेरचे नातलग, आप्तेष्ट, मित्र-मंडळी, सहकारी इत्यादींकडून भेटवस्तू मिळतात. या सर्व भेटवस्तू स्त्रीच्या स्वतःच्या मालकीची संपत्ती आहेत. हक्कसोडपत्र:- माहेरच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागितला तर भाऊ-भावजयी आणि इतर बहिणींशी नातेसंबंधं दुरावतील अशी काळजी वाटते आणि नाही मागितला तर सासरचे नाराज होतात अशा कात्रीत स्त्रिया सापडलेल्या दिसतात. माहेरचा आधार टिकून रहावा म्हणून स्त्रिया माहेरच्या संपत्तीवरील हक्क सोडून देतात. तर कधी भावांकडून संपत्तीवरील हक्क मिळविण्यासाठी कोर्टाच्या फे-या माराव्या लागतात. संपत्तीबाबत कोणताही निर्णय हा वकिलाच्या सल्ल्याने आणि समजून-उमजून घ्यावा. भावनेच्या भरात घेऊ नये.स्वतःच्या संपत्तीबाबत हक्कसोडपत्र, कुलमुखत्यार पत्र किंवा पावर ऑफ एटर्नी असे कोणतेही दस्त करताना योग्य सल्ला घ्यावा. आपले कायदेशीर अधिकार समजून घेऊनच अशा कागदपत्रांवर सही करावी. संपत्तीबाबतचे स्त्रीचे हक्क:- सर्वप्रथम म्हणजे स्त्री कमावती असेल अथवा नसेल तिला तिची संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे.स्वतःच्या मालकीच्या संपत्तीबाबत योग्य ते व्यवहार करण्याचे, निर्णय घेण्याचे हक्क स्वतः त्या स्त्रीलाच असतात इतर कोणालाही या संपत्तीबाबत निर्णय घेण्याचे किंवा व्यवहार करण्याचे अधिकार नाहीत. महिलांना ख-या अर्थी सक्षम बनवायचे असेल तर साधनसंपत्तीवर किंवा आर्थिक बाबींवरचा तिचा अधिकार मानणे आणि तिला तो देणे गरजेचे आहे तरच स्त्री पुरुष समानता येण्यास मदत मिळणार आहे. स्त्रीला आपले आई-वडिल किंवा इतर नातलग यांच्या मालमत्तेतील अधिकार मिळू शकतो. हा अधिकार/हक्क कोणाकडून किती मिळावा हे त्या-त्या धर्माच्या, जमातीच्या व्यक्तीगत कायद्यानुसार ठरते. घर दोघांचे अर्थात राहत्या घरावरील हक्क पती-पत्नीमध्ये भांडण किंवा जमत नसेल तर सहजपणे पत्नीला घराबाहेर काढले जाते सर्वसाधारणपणे सगळीकडे हे चित्र दिसून येते. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने दि. १० ऑक्टोबर १९९४ पासून नवीन नियम केले आहेत. महत्वाच्या तरतुदी जमिनीचा पट्टा, घर आणि प्लॉट हे आता दोघांच्या सामायिक मालकीचे असणार.(शासन निर्णय क्रमांक – प्रवम १०९४/३६२५/१०,८९४) झोपडपट्टीवासीयांना दिल्या जाणा-या ओळखपत्रातील पहिल्या पानावर पती आणि पत्नी दोघांचाही फोटो असेल. नवीन फ्लॅट किंवा प्लॉट घेतल्यानंतर त्यासंबंधीची कागदपत्रे करताना दोघांच्या नावेकरण्यात यावी. तशी कागदोपत्री नोंद करणे गरजेचे आहे.इंदिरा आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाया घरांना पती आणि पत्नी दोघांची नावेद्यावीत(शासन निर्णय क्रमांक – इआया १०९४/प्र.८१/बल१७/दि. १३.१२.९४) लक्षात ठेवा घर किंवा संपत्तीची नोंदणी करताना व्यक्ती अविवाहित असेल तर लग्नानंतर आपोआप पत्नीच्याही घर किंवा संपत्ती नावावर होईल अशी अट आहे. घर दोघांचं–नाव दोघांचं हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६- नुसार महिलांना मिळणा-या मालमत्तेवरील अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कायद्याने घातलेल्या जाचक अटी कमी करण्यात आल्या आहेत. या कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी १९९४ साली दुरूस्ती करण्यात आली तर २००५ मध्ये केंद्राच्या कायद्यामध्ये दुरूस्ती करण्यात येऊन स्त्रियांना संपत्तीमध्ये अधिकार देण्यात आले आहेत. स्त्रियांना संपत्तीमध्ये असे अधिकार देणे हे स्त्री-पुरूष समानतेच्या तत्त्वाच्या आड येत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. वडिलांच्या मालमत्तेत मुलीला मुलाइतका वाटा मिळतो. महिलेला संपत्ती कोणाकडूनही व केव्हाही मिळो, ती विवाहित असो वा अविवाहित, आपल्या मालमत्तेची ती संपूर्ण मालक असते. स्त्रीधन हिंदू स्त्रिया – स्त्रीधन हा शब्दच मुळी स्त्रीच्या धनाशी जोडलेला आहे. हे धन स्त्रीला तिच्या जन्मापासून वारसा हक्काद्वारे, बक्षिसपत्राद्वारे किंवा कायदेशीर भेट अशा अनेक मार्गानी मिळते. स्त्रीधन म्हणजे तिचेच धन ज्यावर कोणाचाही अधिकार नसतो. स्त्रीधन कसे मिळते? वारसा हक्काने, वाटणीमध्ये विवाहापूर्वी, विवाहाचे वेळी व विवाहानंतर नातलग व इतर सासर-माहेरच्या व्यक्तींकडून मिळालेल्या भेटवस्तू, बक्षीस, मालमत्ता इ. विवाहाचे वेळी तिच्या सासरच्या लोकांनी तिला घातलेले दागिनेही तिचे स्त्रीधन होय. तिने स्वत: कमावलेली संपत्ती/मालमत्ता जर सासरची मंडळी तिचे स्त्रीधन परत करण्यास तयार नसतील तर फौजदारी खटलादाखल करुन ती तिच्या चीजवस्तू परत मिळवू शकते. पती कोणतीही मालमत्ता स्वत:च्या नावावर खरेदी करीत असेल तेव्हा सोबत पत्नीचे नाव मालमत्तेवर घातले जावे यासाठी पत्नीने आग्रही राहीले पाहीजे. |