ब्युरो टीम : माय होम इंडिया द्वारे स्थापित करण्यात आलेले भारतीय संगीतसाधकांसाठीचे लता मंगेशकर स्मृति पुरस्कार येत्या शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि प्रख्यात गायक सुदेश भोसले यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.
आठ दशकांची कारकिर्द लाभलेल्या आणि ज्यांचा आवाज आजही जगभरतील कोट्यवधी घरांतून गुंजत असतो अशा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ २०२२ मध्ये या पुरस्कारांची स्थापना करण्यात आली.
भारतीय संगीत क्षेत्रातील गुणवत्तेचा व साधनेचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न म्हणून २०२२ पासून सुरू झालेले हे पुरस्कार हा बालपणापासून लता मंगेशकर यांचे निस्सीम चाहते असलेले माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांच्या संकल्पनेचा एक आविष्कार आहे. त्यामुळेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि आपले जन्मगाव असलेल्या पुण्याची निवड त्यांनी या पुरस्कारांसाठी केली.
प्रख्यात मराठी अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते २०२२ मध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा प्रख्यात गायक सुदेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.