ब्युरो टीम : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वागळे यांनी जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून अडवानी, मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही अवमान केल्याचा आरोप देवधर यांनी तक्रारीत केला आहे. ‘‘अडवानी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वागळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि अडवानी यांच्याविरोधात गरळ ओकणारे विधान केले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींची प्रतिमा मलिन करण्याच्या आणि देशात धार्मिक, जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वागळे यांनी हे ट्वीट केले आहे. सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्थेला धक्का लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वागळेंवर तत्काळ गुन्हा दाखल करावा,’’ असे देवधर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.