विक्रम बनकर (नगर) : विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुन्हा एकदा नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे गेल्या वर्षभरापासून सांगत आहे. वेळोवेळी माझी भूमिका मांडली आहे. आता फक्त तिकीट मिळण्याची वाट पाहत आहे,’ असं शुक्रवारी (१९ जानेवारी) प्रा. राम शिंदेंनी नगर शहरात माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलं. त्यामुळे आता नगर दक्षिणचे भाजपचे विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे नेते व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र खासदार डॉ.सुजय विखे पाटील करतात. मात्र, भाजपने जर ‘एका कुटुंबात एक तिकीट’ असा फॉर्म्यूला लावला, तर विखे पाटलांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्यातच आता नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी भाजपच्या इतर नेत्यांकडूनही मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी तर तसे वेळोवेळी जाहीर सांगितलं आहे. आज पुन्हा एकदा प्रा.शिंदे यांनी लोकसभा लढणार असल्याची इच्छा व्यक्त केलीय.
काय म्हणाले प्रा. शिंदे?
प्रा.राम शिंदे हे शुक्रवारी एका कार्यक्रमासाठी नगर शहरामध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, मी एक वर्षभरापूर्वीच लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. २०१४ मध्ये लोकसभेचे तिकीट मागितले होते, परंतु ते मला मिळाले नाही. २०१९ ला मला पक्ष तिकीट देत होता, तेव्हा मी ते घेतले नाही. पण २०२४ ची लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मी तयार आहे, असं मी एक वर्षभरापूर्वीच सांगितलं आहे. माझा हा संदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून नेतृत्वापर्यंत गेला आहे. आता माझे फक्त वेटिंग फॉर तिकीट सुरू आहे. लोकसभा तिकीटाबाबतचा विषय हा मीडियासमोर बोलण्याचा नाही. परंतु मी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी या जिल्ह्याचा सलग पाच वर्ष पालकमंत्री राहण्याचा रेकॉर्ड माझ्या नावावर आहे. त्याकाळात मी चांगले काम केले असून तसे लोकही म्हणतात. त्यामुळे आता मला लोकसभा निवडणुकीची तिकीट देण्याबाबत काय भूमिका घ्यायची हे पक्ष ठरवेल,’ असेही शिंदे म्हणाले.