विक्रम बनकर (नगर) : महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात,जंगलात किंवा डोंगर भागात लपवायच्या व काही कालांतराने त्या वाहनांचा सोक्षमोक्ष लावायचा ही त्यांची चोरीची सूक्ष्म पद्धत पोलिसांनाही चकवा देणारी होती, मात्र कोतवाली पोलिसांनी टोळीला जेरबंद तर केलेच त्यानंतर त्यांनी चोरलेल्या महागड्या दुचाक्याही हस्तगत केल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी दि.७ डिसेंबर रोजी नगरच्या वैभव घोरपडे यांची पल्सर गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरील दुचाकी चोर हे सराईत असून ते विविध भागातून दुचाकी चोरतात. ते सराईत नेवासा भागात सापडतील अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक यादव यांनी लागलीच गुन्हे शोध पथक तयार करून नेवासा या ठिकाणी रवाना केले.या पथकाने तीन दिवस सूक्ष्म तपास करून त्या ठिकाणाहून अमित अशोक नगरे व धनाजी ज्ञानदेव कुचेकर दोन्ही राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या दोघांना ताब्यात घेतले.त्यांनी चोरी केलेल्या दुचाकीबाबत माहिती विचारली मात्र त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.खोटी माहिती देऊन तपासाची दिशाभूल केली.त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नगर शहरातून ३ संभाजीनगर येथून ३ अशा एकूण ६ मोटारसायकल चोरीची कबुली दिली.त्यामध्ये बजाज पल्सर एन.एस.१२५, आर-१५, पल्सर २२०, एच.एफ. डिलक्स २, डेस्टिनी १२५ अशा सहा दुचाकींचा समावेश आहे. अश्या ५ लाख ५० हजारांच्या ६ दुचाकी कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी वैभव अनिल घोरपडे राहणार बांबू गल्ली नगर, अदनान मन्सूर शेख राहणार झेंडीगेट अहमदनगर, सचिन साहेबराव जोगदंडे राहणार छत्रपती संभाजी नगर, रामदास रांजणे राहणार संभाजीनगर, मिठू श्रीपाद वाल्लेकर राहणार इस्लामपूर अहमदनगर यांच्या असून एका वाहनाचे मालकाचा शोध घेणे सुरू आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभाग पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस अंमलदार तनवीर शेख,गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे,शाहिद शेख,ए. पी. इनामदार,सलीम शेख,अतुल काजळे,अभय कदम, अमोल गाढे,संदीप थोरात,सुजय हिवाळे,सोमनाथ राऊत,वंदना काळे व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू आदींनी केली आहे.