विक्रम बनकर (नगर ) : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) प्रणित जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने आज शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी लोणी येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान वेतन पगारी रजा, शासकीय भत्ते, आरोग्य विमा व इतर सुविधा द्या, या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. सिटू प्रणित शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेने राज्यस्तरावर सर्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना अशाप्रकारे मोर्चे काढून निवेदन देण्याची हाक दिली होती. यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी आज मोर्चा काढत आपले निवेदन पालकमंत्र्यांच्या कार्यालयाला सादर केले. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील नियोजित दौऱ्यानिमित्त पुणे येथे असल्याने त्यांच्या कार्यालयीन सचिवाने निवेदन स्वीकारले व पालकमंत्र्यांना याबाबत अवगत केले. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना विविध तालुक्यांमध्ये मनमानी पद्धतीने कामावरून काढून टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी हे पोषण आहार कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून शाळांची स्वच्छता करून घेणे अपेक्षित नाही. असे असताना अनेक शाळांमध्ये कर्मचाऱ्यांना शाळेचे प्रांगण व शाळा खोल्या साफ करण्याचे काम सक्तीने करायला लावले जाते, या विरोधातही यावेळी आवाज उठवण्यात आला. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत, त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कुटुंब चालवणेही अवघड होऊन जाते, याबाबतही यावेळी मागण्या मांडण्यात आल्या. सरकारने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी व किमान वेतन, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, नियमित पगार, इत्यादी मागण्या मान्य कराव्यात. शासनाने कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांची दखल न घेतल्यास यापुढे पोषण आहार कर्मचारी प्रसंगी संपावर जाऊन सरकारच्या विरोधात आंदोलन करतील असा इशारा यावेळी सिटूचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मेहबूब सय्यद यांनी दिला. किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. डॉ. अजित नवलेव सदाशिव साबळे यांनी मोर्चेकरी व प्रशासन यांचा समन्वय करून देण्यासाठी भूमिका बजावली. मोर्चाचे नेतृत्व कॉ. संतोष शिर्के, कॉ. शितल दळवी, संतोष बोरुडे, गणेश जाधव, अनिल रायकर प्रशांत कोल्हे, चंद्रकांत ससाने, नंदा बांगर, राधिका सोनवणे, बाळासाहेब विटनर, शिला डोंगरे, माई नरोडे, अशोक कोरडे, अर्चना गायकवाड, रोहिणी यादव, रोहिणी काळे, जागृती अडांगळे, सविता भुकन, सपना भुजबळ, योगेश गुलाब विधाटे यांनी केले अशा कर्मचारी संघटनेच्या संगीता साळवे यांनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या या मोर्चाला जनशक्ती आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला.