विक्रम बनकर (नगर) : १३८ वर्षाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या काँग्रेस पक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेची किमान एक जागा लढवावी,” असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. विनायकराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केले आहे.
यासंदर्भात श्री. देशमुख यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.श्री. मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी, खा. श्री राहुल गांधी, राष्ट्रीय महासचिव श्री, के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी श्री, रमेश चेन्नीथाला व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्याकडे पत्राद्वारे आग्रही मागणी केली आहे. या बाबत लवकरच आपण या नेत्यांची समक्ष भेट घेणार असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.
“जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी व पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आगामी निवडणूक ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यापूर्वीच्या लोकसभा , विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आघाडी केल्यामुळे अनेक मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे चिन्ह विस्मृतीत गेले आहे. याबाबत काँग्रेस पक्षाचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते मोठी खंत व्यक्त करतात. कितीही राजकीय स्थित्यंतरे झाली तरी काँग्रेस पक्षाचे किमान २० टक्के मतदार हे आजही कायम आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील किमान एका लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढविणे अत्यंत आवश्यक आहे.
“पक्षाचे गाव पातळीवरील कार्यकर्ते हे पक्षाच्या आदेशानुसार संघटना बांधणीचे काम करत असतात. मागील पाच वर्षे देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले आहेत. त्याशिवाय पक्षादेशानुसार आंदोलने, मोर्चे, मेळावे यांचे देखील आयोजन केले आहे. हे सर्व आयोजन करताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने आपली मोठी शक्ती संघटना बांधणीसाठी वापरली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकसभेची किमान एक जागा काँग्रेस पक्षाने लढवलीच पाहिजे.” अशी आग्रही भूमिका श्री.देशमुख यांनी मांडली आहे.
“लोकशाहीत सार्वत्रिक निवडणुका म्हणजे एक प्रकारे राजकीय युद्ध असते. या युद्धासाठी पक्षाचे कार्यकर्ते पाच वर्ष तयारी करत असतात. जर या राजकीय सैनिकांना लढण्याचीच संधीच न मिळाल्यास त्यांच्यामध्ये राजकीय हतबलता निर्माण होऊन त्याचा पक्ष संघटनेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आघाडीच्या राजकारणामुळे निर्माण झालेली अनिवार्यता व मर्यादा लक्षात घेता ” जिंकण्याची क्षमता ” हा निकष कितीही आकर्षक वाटत असला तरीही पक्षाच्या भविष्यकालीन राजकीय अस्तित्वाचा आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा बळी दिला जाऊ नये,” अशी अपेक्षा श्री. देशमुख यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
“जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची यासंदर्भातील मते जाणून घेण्यासाठी व पक्षाच्या दूरगामी अस्तित्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार असुन काॅन्ग्रेसच्या जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची व युवकांची भेट घेणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.”