ब्युरो टीम : पुणे शहरात विमाननगर भागात अवैधरित्या बाळगण्यात आलेल्या १० घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने पुढील अनर्थ टळला, परंतु या घटनेमुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या
अनुषंगाने माजी नगरसेवक सनी निम्हण क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत निरीक्षक पाठवून लक्ष ठेवण्याचे मागणी केली आहे.

पुणे शहरात यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अवैध पद्धतीने होणारी गॅस सिलेंडरची खरेदी-विक्री, सिलेंडरचा अवैध पद्धतीने साठा करणे, असुरक्षित पद्धतीने सिलेंडरची वाहतूक व हाताळणी तसेच व्यावसायिक कारणासाठी होणारा घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर, वाहनांमध्ये अवैध पद्धतीने घरगुती वापराचा गॅस वापरणे आणि त्यासाठी तो चुकीच्या पद्धतीने वाहनात भरणे असे प्रकार शहरात अनेक ठिकाणी निदर्शनास येत असतात.अनेक छोटे हॉटेल व्यावसायिक तर रस्त्यावर भर गर्दीमध्ये अशा प्रकारे असुरक्षित पद्धतीने घरगुती गॅसचा इंधन म्हणून वापर करतात.या सर्व प्रकारांमुळे सर्वसामान्य जनते सोबतच या व्यवसायिक बांधवांची सुरक्षा देखील धोक्यात आलेली दिसत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.तरी पुणे महानगरपालिका प्रशासनाने या संदर्भात जनजागृती बरोबरच आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी मोहीम राबवावी. तसेच या मोहिमेत पुणे शहरातील लोकप्रतिनिधी आणि गॅस एजन्सी यांचे देखील सहकार्य घ्यावे.

पुढे अशा घटना घडू नये म्हणून पुणे महानगरपालिकेने कडक कार्यवाही करण्याची भूमिका घ्यावी व क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या अश्या ठिकाणी निरीक्षक पाठवून लक्ष ठेवण्याची मागणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांना पत्राद्वारे माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केली आहे.