ब्युरो टीम : गेल्या एकेचाळीस वर्षांपासून अकलूज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह भाड्याच्या इमारतीत आहे. त्याचे मासिक भाडे ८० हजार असतानाही त्याठिकाणी विद्यार्थ्यांची खूप दुरावस्था होत आहे. त्यामुळे या विद्यार्थी वसतिगृहाला शासकीय जागा उपलब्ध व्हावी यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत एड. अविनाश काले, नागेश लोंढे व गौतम भंडारे या तीन पत्रकारांनी दोन दिवस पाण्याचा एक थेंबही न घेता उपोषण केले होते. तेव्हा याबाबत ठोस लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित करून सदरची बाब आमदार रामभाऊ सातपुते यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर माळशिरसचे कर्तव्यदक्ष आमदार रामभाऊ सातपुते यांनी याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांतून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

अकलूज शहर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. प्राथमिक शाळा ते उच्च माध्यमिक व पदवी पर्यंतच्या शिक्षणाची इथे व्यवस्था असल्याने याठिकाणी शासनाने शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवास व भोजन याची सोय व्हावी म्हणून १९८२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सुरू केले. सुरूवातीला हे वसतिगृह अकलूज येथील बाजार समितीच्या आवारातील इमारतीत सुरू केले होते, तेथून ते खाजगी मालकीची अपुरी जागा असलेल्या इमारतीत जुन्या बस स्थानकाच्या मागील बाजूस रुची डायनिंग हॉल येथे स्थलांतरित करण्यात आले. आज अखेर शासनाने या वसतिगृहासाठी २ कोटीच्या आसपास रुपये मोजले आहेत. परंतु भरमसाठ भाडे देवूनही अपुरी जागा असल्याने, शासनाद्वारे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनेक सुविधा आणि उपकरणे वापराविना कित्येक वर्षे पडून राहिली आहेत. वास्तविक पाहता हे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत असल्याने ते या इमारतीच्या मालकाचे चरण्याचे कुरणच बनले आहे.

अकलूजमधील शैक्षणिक व्यवस्था पाहता मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाची अकलूजमध्ये स्वंतत्र इमारत होणे अपेक्षित होते, परंतु ते अद्यापही झालेले नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांची हेळसांड लक्षात घेऊन या वसतिगृहाच्या स्वतंत्र इमारतीसाठी सदरच्या पत्रकारांनी उपोषण केले होते. तेव्हा मागील हिवाळी अधिवेशनात माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार रामभाऊ सातपुते यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करून सदरचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला होता. तो प्रश्न तेव्हाच मार्गी लागला असता. मात्र कामकाजाच्या दरम्यान पुण्याच्या कसबा मतदारसंघाच्या आमदार स्व. मुक्ता टिळक यांचे दुःखद निधन झाल्यामुळे तो प्रश्न राहून गेला होता असे आमदार रामभाऊ सातपुते यांनी सांगितले होते.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम भंडारे यांनी माळशिरस येथे आमदार रामभाऊ सातपुते यांना भेटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडण्याची विनंती केली होती. तेव्हा आमदार रामभाऊ सातपुते यांनी सदरचा प्रश्न अत्यंत महत्वाचा असल्याने या अधिवेशनातच कॅबिनेट बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे म्हटले. त्याप्रमाणे त्यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, “माझ्या मतदारसंघात अकलूज हे एक शैक्षणिक हब आहे. अकलूजमध्ये बीएस्सी, नर्सिंग व मेडिकल कॉलेजस् आहेत. वेगवेगळे इन्स्टिट्युट आहेत. त्याठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे, परंतु त्या वसतिगृहाची अवस्था खूपच विदारक आहे. वसतिगृहाची इमारत कधी पडेल हे सांगता येत नसल्याने तिथे मुलांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे एक राखीव मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की, अकलूजमध्ये भाडेतत्वाच्या इमारतीत सुरू असलेल्या वसतिगृहाला शासनाने शासकीय जमीन देऊन व निधी देऊन त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची उभारणी करावी.” वास्तविक पाहता २००९ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सलग दहा वर्षे स्व. हनमंत डोळस आमदार म्हणून राहिले. मात्र त्यांनी मागासवर्गीयांचे प्रश्न सोडाच, सर्वसामान्य कुठल्याच लोकांचे प्रश्न सोडविले नाहीत. ते आपला कारभार मुंबईतूनच हाकत होते. परंतु फक्त चारच वर्षात आमदार रामभाऊ सातपुते हे आपल्या कामांच्या जोरावर सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईतच बनले आहेत. तसेच त्यांनी अल्पावधीतच अनेक लोकांचे उपचार पुण्यातील नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये करून आरोग्यदूत अशी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान गेल्या एकेचाळीस वर्षांपासून रखडलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावल्याने सोलापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.