अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)
           प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या मालकीची संपत्ती बाळगण्याचा, त्या संपत्तीचा स्वतःच्या मर्जीप्रमाणे उपयोग करण्याचा किंवा स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्या संपत्तीचे वाटप, विक्री किंवा दान करण्याचाही स्त्रीला हक्क आहे.

           स्त्रीला संपत्ती मिळण्याचे मार्ग

          कमावती स्त्री स्वतः नोकरी-व्यवसायातून मिळवत असलेला पगार, तिला मिळणारे मानधन, व्यवसायात मिळणारा नफा, घरगुती वस्तु, कलाकुसरीच्या वस्तू, खाद्यपदार्थ ईत्यादी तयार करून त्यांच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न, वगैरे संपत्ती ही तिची स्वकष्टार्जित म्हणजेच स्वतः कमावलेली संपत्ती होय. मग अगदी कुटुंबाच्या पारंपारीक, सामायिक व्यवसायाला स्त्री हातभार लावत असेल तर तो ही तिच्या उत्पन्नाचा स्रोतच आहे. अशा एकत्रित व्यवसायात स्त्री देत असलेल्या हातभाराची दखल घेतली गेली पाहीजे. त्या व्यवसायातील उत्पन्नातून तिला स्वतःसाठी पैसे मागण्याचा हक्क आहे आणि ते उत्पन्न तिचे वैयक्तिक उत्पन्न अर्थातच तिची वैयक्तिक संपत्ती मानली जाईल. याशिवाय वाढदिवस, साखरपुडा, लग्न, लग्नानंतरचे पहिले बारा सण, लग्नाचा वाढदिवस, डोहाळेजेवण, बाळंतपण, बारसे,सण-समारंभ, गृहप्रवेश, इतरांचे विवाहसमारंभ अशा अनेक निमित्ताने बरेचदा स्त्रियांना मौल्यवान भेटवस्तू मिळतात. अशा कोणत्याही निमित्ताने माहेरच्या तसेच सासरच्या मंडळींनी तिला दिलेले दागिने हे तिच्या मालकीचे असतात. परिक्षेत चांगले गुण मिळाले, नवीन नोकरी मिळाली, नोकरीत बढती मिळाली, नोकरीतील निरोप समारंभ, निवृत्ती अशा निमित्तानेही स्त्रियांना सासर-माहेरचे नातलग, आप्तेष्ट, मित्र-मंडळी, सहकारी इत्यादींकडून भेटवस्तू मिळतात. या सर्व भेटवस्तू स्त्रीच्या स्वतःच्या मालकीची संपत्ती आहेत.
           तसेच स्वतःच्या उत्पन्नातून स्त्री स्वतः संपत्ती खरेदी करते तीही संपत्ती तिची स्वकष्टार्जित आणि स्वतःच्या मालकीची असते. इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र, (WILL) बक्षीसपत्र किंवा दानपत्र (GIFT DEED) अशा मार्गाने कोणी एखाद्या स्त्रीला संपत्ती दिली तर ती संपत्ती त्या स्त्रीच्या मालकीची होती. स्त्रीला वाड-वडीलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळतो, सासरच्या संपत्तीमध्ये काही कारणांनी हिस्सा मिळतो, घटस्फोटानंतर एकरकमी पोटगी म्हणून काही रक्कम मिळू शकते, ही सर्व संपत्ती तिच्या मालकीची होते. अनेक स्त्रियांना काही कारणानी पतीपासून घटस्फोट घेऊन विभक्त व्हावे लागले तर बरेचदा दरमहा पोटगी घेण्यापेक्षा पोटगीची एकत्रित रक्कम एकाच वेळी पतीकडून ताब्यात घेणे पती-पत्नी दोघांनाही सोयीचे असते. काही वेळेस एकरक्कमी पोटगी ऐवजी शेतजमिनीतील एखादा हिस्सा, निवासी गाळा किंवा घर, दुकान अशा स्थावर मालमत्तेमध्ये पत्नीला हिस्सा दिला जातो. अशा रितीने मिळालेला हिस्सा ही तिची वैयक्तिक मालकीची संपत्ती गणली जाते. या संपत्तीच्या वापर, खरेदी-विक्री, अशा संपत्तीतून तिला येणारे उत्पन्न यावर फक्त तिचाच अधिकार असेल. लग्नामध्ये खर्च केला, सासरच्यांना हुंडा दिला, लग्नात मुलीच्या अंगावर दागिने घातले, तिच्या शिक्षणासाठी खर्च केला अशी अनेक लटकी कारणे सांगून मुलीला माहेरच्या संपत्तीमध्ये हिस्सा देण्याचे टाळले जाते. हे कायदेसंमत नाही. वरील परिस्थिती काहीही असली तरी तिचा माहेरच्या संपत्तीतील हक्क अबाधितच रहातो.

           हक्कसोडपत्र:-

           माहेरच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागितला तर भाऊ-भावजयी आणि इतर बहिणींशी नातेसंबंधं दुरावतील अशी काळजी वाटते आणि नाही मागितला तर सासरचे नाराज होतात अशा कात्रीत स्त्रिया सापडलेल्या दिसतात. माहेरचा आधार टिकून रहावा म्हणून स्त्रिया माहेरच्या संपत्तीवरील हक्क सोडून देतात. तर कधी भावांकडून संपत्तीवरील हक्क मिळविण्यासाठी कोर्टाच्या फे-या माराव्या लागतात. संपत्तीबाबत कोणताही निर्णय हा वकिलाच्या सल्ल्याने आणि समजून-उमजून घ्यावा. भावनेच्या भरात घेऊ नये.स्वतःच्या संपत्तीबाबत हक्कसोडपत्र, कुलमुखत्यार पत्र किंवा पावर ऑफ एटर्नी असे कोणतेही दस्त करताना योग्य सल्ला घ्यावा. आपले कायदेशीर अधिकार समजून घेऊनच अशा कागदपत्रांवर सही करावी.

           संपत्तीबाबतचे स्त्रीचे हक्क:-

           सर्वप्रथम म्हणजे स्त्री कमावती असेल अथवा नसेल तिला तिची संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे.स्वतःच्या मालकीच्या संपत्तीबाबत योग्य ते व्यवहार करण्याचे, निर्णय घेण्याचे हक्क स्वतः त्या स्त्रीलाच असतात इतर कोणालाही या संपत्तीबाबत निर्णय घेण्याचे किंवा व्यवहार करण्याचे अधिकार नाहीत. महिलांना ख-या अर्थी सक्षम बनवायचे असेल तर साधनसंपत्तीवर किंवा आर्थिक बाबींवरचा तिचा अधिकार मानणे आणि तिला तो देणे गरजेचे आहे तरच स्त्री पुरुष समानता येण्यास मदत मिळणार आहे. स्त्रीला आपले आई-वडिल किंवा इतर नातलग यांच्या मालमत्तेतील अधिकार मिळू शकतो. हा अधिकार/हक्क कोणाकडून किती मिळावा हे त्या-त्या धर्माच्या, जमातीच्या व्यक्तीगत कायद्यानुसार ठरते.

           घर दोघांचे अर्थात राहत्या घरावरील हक्क

           पती-पत्नीमध्ये भांडण किंवा जमत नसेल तर सहजपणे पत्नीला घराबाहेर काढले जाते सर्वसाधारणपणे सगळीकडे हे चित्र दिसून येते. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने दि. १० ऑक्टोबर १९९४ पासून नवीन नियम केले आहेत.

           महत्वाच्या तरतुदी

           जमिनीचा पट्टा, घर आणि प्लॉट हे आता दोघांच्या सामायिक मालकीचे असणार.(शासन निर्णय क्रमांक – प्रवम १०९४/३६२५/१०,८९४) झोपडपट्टीवासीयांना दिल्या जाणा-या ओळखपत्रातील पहिल्या पानावर पती आणि पत्नी दोघांचाही फोटो असेल. नवीन फ्लॅट किंवा प्लॉट घेतल्यानंतर त्यासंबंधीची कागदपत्रे करताना दोघांच्या नावेकरण्यात यावी. तशी कागदोपत्री नोंद करणे गरजेचे आहे.इंदिरा आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाया घरांना पती आणि पत्नी दोघांची नावेद्यावीत(शासन निर्णय क्रमांक – इआया १०९४/प्र.८१/बल१७/दि. १३.१२.९४) लक्षात ठेवा घर किंवा संपत्तीची नोंदणी करताना व्यक्ती अविवाहित असेल तर लग्नानंतर आपोआप पत्नीच्याही घर किंवा संपत्ती नावावर होईल अशी अट आहे. घर दोघांचं–नाव दोघांचं

           हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६-

           नुसार महिलांना मिळणा-या मालमत्तेवरील अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कायद्याने घातलेल्या जाचक अटी कमी करण्यात आल्या आहेत. या कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी १९९४ साली दुरूस्ती करण्यात आली तर २००५ मध्ये केंद्राच्या कायद्यामध्ये दुरूस्ती करण्यात येऊन स्त्रियांना संपत्तीमध्ये अधिकार देण्यात आले आहेत. स्त्रियांना संपत्तीमध्ये असे अधिकार देणे हे स्त्री-पुरूष समानतेच्या तत्त्वाच्या आड येत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. वडिलांच्या मालमत्तेत मुलीला मुलाइतका वाटा मिळतो. महिलेला संपत्ती कोणाकडूनही व केव्हाही मिळो, ती विवाहित असो वा अविवाहित, आपल्या मालमत्तेची ती संपूर्ण मालक असते.
           वडिलांच्या मालमत्ता स्वकष्टार्जित म्हणजे स्वत: कमावलेली आणि मृत्युपश्चात ती संपत्ती कोणा विशिष्ठ व्यक्तिला देण्याबाबत काही सूचना नसतील, ईच्छापत्र अथवा मृत्यूपत्र केले नसेल तर भाऊ-बहिणींना वडीलांच्या संपत्तीमध्ये समान हिस्सा मिळतो. त्यांच्या संपत्तीचे वाटप करीत असताना मुलगी विवाहीत आहे की अविवाहीत असा भेदभाव केला जात नाही. सर्व भावंडांना समान हिस्सा मिळतो. पती -पत्नी वेगळे रहात असतील किंवा कायदेशीरपणे विलग असतील तरीही पतीच्या पश्चात पतीच्या संपत्तीवर पत्नीला हक्क असतो. एखाद्या स्त्रीस वैधव्य आले, तिने घटस्फोट घेतला अथवा पुनर्विवाह केला तर अशा बाबींची तिच्या वडीलांच्या पश्चात तिला तिच्या वडिलांच्या (वडिलोपार्जित व स्वकष्टार्जित) संपत्तीवर अधिकार, हिस्सा मिळण्यात काहीही बाध येत नाही. वडीलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळण्याशी तिच्या पुनर्विवाह, घटस्फोट अथवा वैधव्य या बाबींचा अडथळा ठरत नाहीत. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिला वडीलोपार्जित संपत्तीतून बेदखल केले जात असेल तर ते बेकायदेशीर आहे. विधवा सून किंवा पत्नीने पुनर्विवाह केला तरीही तिचा संपत्तीचा हिस्सा काढून घेता येत नाही. स्वतःच्या हिश्शाची-मालकीची तसेच स्वतः कमविलेली संपत्ती मृत्युपत्राद्वारे कोणालाही देण्याचा तिला अधिकार आहे. तिने मृत्युपत्र न केल्यास तिची संपत्ती तिच्याच वारसांना मिळते. कायद्याने वारसा क्रम ठरवून दिलेला आहे. कोणतीही स्त्री पिढीजात घराची वाटणी करवू शकते. हिंदू पुरुषाप्रमाणे स्त्रीचाही म्हणजे मुलीचाही वडिलोपार्जित (आजोबा, वडिलांच्याकडून मिळालेली) मालमत्तेवर जन्मजात हक्क असतो.

           स्त्रीधन

           हिंदू स्त्रिया – स्त्रीधन हा शब्दच मुळी स्त्रीच्या धनाशी जोडलेला आहे. हे धन स्त्रीला तिच्या जन्मापासून वारसा हक्काद्वारे, बक्षिसपत्राद्वारे किंवा कायदेशीर भेट अशा अनेक मार्गानी मिळते. स्त्रीधन म्हणजे तिचेच धन ज्यावर कोणाचाही अधिकार नसतो.

           स्त्रीधन कसे मिळते?

           वारसा हक्काने, वाटणीमध्ये विवाहापूर्वी, विवाहाचे वेळी व विवाहानंतर नातलग व इतर सासर-माहेरच्या व्यक्तींकडून मिळालेल्या भेटवस्तू, बक्षीस, मालमत्ता इ. विवाहाचे वेळी तिच्या सासरच्या लोकांनी तिला घातलेले दागिनेही तिचे स्त्रीधन होय. तिने स्वत: कमावलेली संपत्ती/मालमत्ता जर सासरची मंडळी तिचे स्त्रीधन परत करण्यास तयार नसतील तर फौजदारी खटलादाखल करुन ती तिच्या चीजवस्तू परत मिळवू शकते. पती कोणतीही मालमत्ता स्वत:च्या नावावर खरेदी करीत असेल तेव्हा सोबत पत्नीचे नाव मालमत्तेवर घातले जावे यासाठी पत्नीने आग्रही राहीले पाहीजे.