ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावात ३० लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यावरून माजी मंत्री शिंदे यांनी तर थेट रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिंदे म्हणाले, ‘राज्य निवडणूक आयोगाची एक आचारसंहिता ठरली आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, लोकांवर दबाव तंत्र वापरणे, पैशाचा वापर करणे, हे गैर आहे. एखाद्या आमदारांनी विकासाला चालना दिली पाहिजे. विकास केला पाहिजे. याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यास देखील दुमत नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार हे घटनाविरोधी बोलतात, आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत.

          ते पुढे म्हणाले ‘रोहित पवार यांनी जे तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, ते लोकांना प्रलोभने देणारे आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करावी. ग्रामपंचायत निवडणूक दबाव आणून ते बिनविरोध करत असतील तर ते देश हुकूमशाहीला नेण्याचे चित्र निर्माण करत आहे. ‘आज ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ते पैसे देतात, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, खासदार, आमदार यांच्या निवडणुका अशाच बिनविरोध होतील व त्यामुळे टाटा, बिर्ला हेच लोक आमदार-खासदार होतील, असा टोलाही त्यांनी पवार यांना लगावला. तरी राज्य निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत. त्यासाठी आवश्यक असेल तर समिती गठित करावी,’ अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.