अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)
           हिंदू विवाहविषयक कायदा १९५५ या कायद्याचे ब्रिटिश अंमलापूर्वीचा कायदा, ब्रिटिश अंमल असताना फुटकळ स्वरूपाच्या अधिनियमामुळे निर्माण झालेला अंशतः सुधारित केलेला कायदा व स्वतंत्र्याप्राप्तीनंतर हिंदू विवाह अधिनियम १९५५ व त्यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा यांमुळे निर्माण झालेला सर्वस्वी नवीन संपृक्त व स्वयंपूर्ण स्वरूपाचा कायदा, असे तीन प्रकारचे भाग पाडता येतील.
           ब्रिटिश अंमलापूर्वी आणि बव्हंशी ब्रिटिश अंमल असतानासुद्धा हिंदू विवाहविषयक कायदा हिंदू धर्मशास्त्रावर म्हणजे श्रुति, स्मृति, टीका ग्रंथ व रुढी आणि परंपरा यांवरच प्रमुख्याने अवलंबून होता. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ‘विवाह’ हा संस्कारांपैकी एक संस्कार असून त्याने घडवून आणलेले पतिपत्नी संबंध अपरिवर्तनीय स्वरूपाचे असतात. म्हणजेच पतिपत्नींची ताटातूट स्वेच्छेने वा अन्य कारणाने शक्य नव्हती. फक्त दोघा जोडीदारांपैकी एकाच्या मृत्यूनेच हे संबंध संपुष्टात येऊ शकत असत. व नवऱ्याला कितीही बायका करण्याची मुभा होती; पण पत्नीला मात्र एकाच पतीशी लग्न करण्याची अनुज्ञा होती. वधूवरांना वयाची वा संमतीची अट नव्हती. त्यामुळे बालविवाह किंवा मनोरुग्णांचे विवाह निषिद्ध नव्हते. मात्र दोन्ही जोडीदार हिंदू असणे व एकाच जातीचे व उपजातीचे असणे आवश्यक होते. पिता व माता यांच्याकरवी संबंधित असलेल्या जवळच्या नातेवाईकांना ‘सपिंड’ अशी संज्ञा होती व एकमेकांचे सपिंड असलेल्या मुलामुलींचे विवाह प्रतिषिद्ध मानलेले होते. त्याचप्रमाणे सगोत्र व सप्रवर विवाहसुद्धा धर्मशास्त्राने निषिद्धच ठरविलेले होते. विवाहामुळे पत्नी पतीची अर्धांगी बनून धर्म, अर्थ व काम या विषयांमध्ये पतीशी एकरूप होते. तिचा आयुष्यभर सांभाळ करणे हे पतीचे अपरिहार्य कर्तव्य होते. ती व्यभिचारी असली, तरी पती ह्या कर्तव्यातून मुक्त होत नसे.
          विधवाविवाह हा नारदमुनींसारख्या काही ऋषींनी जरी अनुज्ञेय मानला असला, तरी रूढी व परंपरा यांच्या दडपणाखाली ब्रिटिश अंमल सुरू होण्याच्या काळापर्यंत तो सामाजिक दृष्ट्या, काही जातींचा अपवाद वगळता, निषिद्धच ठरला होता. पतीच्या मृत्युप्रसंगी पण अपवादात्मक प्रसंगी निदान स्वेच्छेने तरी सती जाण्याची चाल होती. काही सनातन घरण्यांमध्ये सती जाण्यास जबरदस्ती केली जात असावी, असा संशय घेण्याइतपत पुरावा सापडतो. सारांश, बहुपत्नीकत्वाच्या चालीमुळे व विवाहाच्या आमरण संबंधामुळे पत्नीला संसारामध्ये दुय्यम स्थान होते. धर्मशास्त्राने मान्य केलेल्या ब्राह्म, देव, आर्ष व प्रजापत्य व मान्यताविहीन अशा गांधर्व, आसुर, राक्षस व पैशाच या विवाहप्रकरांपैकी साधारणपणे ब्रह्म व आसुर हेच विवाह जास्त होते.
          ब्राह्म विवाहामध्ये वधूपिता वधूचे सालंकृत कन्यादान वरास करतो, तर आसुर विवाहामध्ये वर अथवा त्याची मंडळी ही वधूपक्षाला, वधूची पैसे वा तत्सम वस्तूमध्ये किंमत मोजून तिला जवळजवळ वधू या नात्याने, विकतच घेत असत. विवाह पतिपत्नींच्या पूर्वापार चालत आलेल्या रीतिरिवाजानुसार साजरे होत असले, तरी विवाह-होम व सप्तपदी हे विधी बहुसंख्य विवाहांमध्ये केले जात.
          ब्रिटिश अंमलामध्ये धर्मशास्त्रोक्त हिंदू विवाह कायद्यामध्ये काही जुजबी स्वरुपाच्या सुधारणा अधिनियमांच्या द्वारा करण्यात आल्या. त्यांपैकी काही ठळक तरतुदांचा येथे परामर्श घेतला आहे. प्रथम लॉर्ड बेंटिकने सतीची चाल कायद्याने बंद केली (१८२९). हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम १८५६ या कायद्यामुळे हिंदू विधवांना पुनर्विवाहाची मुभा मिळाली; परंतु त्या कायद्यानुसार पुनर्विवाह केल्यास विधवेला आपल्या पहिल्या नवऱ्याच्या मालमत्तेतील वारसाहक्काला मुकावे लागत असे. हल्ली सर्वोच्च न्यायालयाच्या एक निर्णयामुळे विधवेच्या हक्काला अशी बाधा येणे बंद झालेले आहे.
          त्यानंतर हिंदू विवाह अपात्रता निरसन अधिनियम १९४६ व हिंदू विवाह वैधतै अधिनियम १९४६ व हिंदू विवाह वैधता अधिनियम १९४९ या दोन अधिनियमांन्वये सगोत्र, सप्रवर तसेच भिन्न उपजाती व भिन्न जातींतील विवाहास वैधानिक मान्यता देण्यात आली. सदरहू दोन्ही अधिनियम हिंदू विवाह अधिनियम १९५५ या कायद्याखाली रद्द किंवा निरसित करण्यात आलेले असले, तरी त्यांतील तरतुदी १९५५ च्या अधिनियमामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. प्रांतांना स्वायत्तता मिळाल्यावर मुंबई प्रातांमध्ये मुंबई हिंदू द्विभार्या प्रतिबंध अधिनियम १९४६ व मुंबई हिंदू घटस्फोट अधिनियम १९४७ हे कायदे पास करण्यात आले व त्यांचे अनुकरण मद्रास व सौराष्ट्र या त्यावेळच्या प्रांतांत करण्यात आले. मात्र केंद्र सरकारच्या स्तरावर कोणतीही उल्लेखनीय स्वरूपाची सुधारणा करण्यात आली नाही.
          स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र हिंदू विवाह अधिनियम १९५५ हा संपृक्त व परिपूर्ण स्वरूपाचा कायदा भारतीय संसदेने पास केला. त्याच्या कलम नंबर ४ च्या तरतुदीनुसार धर्मशास्त्र, रूढी किंवा परंपरा, न्यायनिर्णय इ. व फक्त अधिनियम वगळता इतर कोणत्याही उगमस्त्रोतांवर आधारित असलेला हिंदू विवाहविषयक कायदा रद्दबातल करण्यात आलेला असून पूर्वीच्या अधिनियमातील ज्या तरतुदी १९५५ च्या अधिनियांशी विसंगत नसतील, त्याच चालू राहतील.
           हिंदू विवाह अधिनियम १९५५ हा संपूर्ण भारतातील हिंदूंना तसेच परदेशी वास्तव्य करणाऱ्या सर्व भारतीय हिंदूंना लागू आहे. हिंदू या शब्दामध्ये धर्माने जे हिंदू आहेत त्यांचा तसेच जे जैन, बौद्ध किंवा शीख धर्माचे आहेत त्यांचाही अतर्भाव होतो. विवाहविषयक पूर्वशर्ती, विवाहविधी (संस्कार इ.), शून्य व शून्यनीय विवाह, दांपत्याधिकाराचे पुनःस्थापन, न्यायालयीन विभक्तता, घटस्फोट, पोटगी या व इतर अनेक विषयांसंबंधी बऱ्याच तरतुदी १९५५ च्या अधिनयमांत विस्तृतपणे देण्यात आल्या आहेत. त्यांचे संक्षिप्त निरुपण पुढीलप्रमाणे आहे.

          विवाहासाठी पूर्वशर्ती

           कोणत्याही हिंदू वधूवरांचा विवाह होण्यापूर्वी कलम नं. ५ प्रमाणे खालील शर्तींची पूर्तता झाली पाहिजे

           (१) विवाहसमयी वधूवरांस अगोदरचा पती किंवा अगोदरची पत्नी असता कामा नये. याचाच अर्थ कोणत्याही पुरुषाला एका वेळी एका पत्नीपेक्षा अधिक पत्नी असणार नाहीत वा कोणत्याही पत्नीला एकाच वेळी एकापेक्षा अधिक पती असू शकत नाहीत. हिंदू पुरुषाच्या वैवाहिक क्षमतेमध्ये या अटीमध्ये या अटीमुळे आमूलाग्र फरक पडलेला असून द्विभार्या विवाहास ह्या अटीमुळे संपूर्ण प्रतिबंध करण्यात आला आहे. पत्नीला अर्थआत अनेक पती असण्याची मुभा हिंदू कायद्यात कधीच नव्हती.
          (२) विवाहाच्या समयी वधूवरांपैकी कोणीही मनोदौर्बल्यामुळे विवाहास समंती देण्यात असमर्थ असता कामा नये, किंवा संमतीसाठी समर्थ असल्यास मनाच्या असमतोलपणामुळे विवाह करण्यास व प्रजोत्पादनास समर्थ असता कामा नये, अथवा त्याला व तिला वारंवार बुद्धिभ्रमाचे किंवा अपस्माराचे झटके येत असता कामा नयेत.
           (३) वराचे वय पूर्ण २१ वर्षे व वधूचे वय पूर्ण १८ वर्षे असले पाहिजे.
           (४) वधूवर हे प्रतिषिद्ध नात्यामध्ये असता कामा नयेत. प्रतिषिद्ध जवळीक असणाऱ्या नातेवाईकांची यादी या अधिनियमात दिलेली आहे.
           (५) वधूवर हे एकमेकांचे सपिंड असता कामा नयेत. कोणते नातेवाईक एकमेकांचे सपिंड ठरतील हे समजण्याच्या दृष्टीने सपिंड शब्दाची व्यापक व्याख्या अधिनियमामध्ये देण्यात आली आहे. वास्तविक पाहता (४) व (५) या अटींचे उद्दिष्ट निकटच्या नातेवाईकांच्या विवाहास प्रतिबंध करणे, हेच असल्यामुळे एकाच अटीचा अंतर्भाव या कलमात केला असता, तरी चालण्याजोगे होत.

           विवाहविधी
          उपरोक्त अधिनियमाच्या कलम नं. ७ प्रमाणे हिंदू विवाह हा वधूवरांपैकी कोणाली एकाला लागू असलेल्या रूढींना समंत असतील असे विधी करून पूर्ण करता येतो. परंतु जर अशा विधीमध्ये सप्तपदीची अंतर्भाव असेल, तर मात्र वधूवरांनी सातवे पाऊल एकत्र टाकेपर्यंत विवाह पूर्ण व बंधनकारक होणार नाही. कलम नं. ५ व नं. ७ यांची जुळवणी केली, तर या अधिनियमाला अभिप्रेत असलेला हिंदू विवाह हा अजूनही अंशतः करार व अंशतः संस्कार या स्वरूपाचा आहे, असे म्हणावे लागते.