गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि त्या त्यामुळे होणारे लॉकडाऊन यामुळे बेरोजगारीची त्सुनामी भारतासह संपूर्ण जगावर कोसळली. यात सर्वात जास्त भरडला गेला तो म्हणजे हातावर पोट असणारा व मोलमजुरी करून जगणारा मजूरवर्ग. पण याही परिस्थितीत विविध उपक्रमाद्वार “स्नेहालय-उचल फाउंडेशन” ने आपले कार्य सातत्याने सुरू ठेवून अनेक कुटुंबांना किराणा अन्नधान्य इत्यादी पुरवण्याचे काम केले. गेल्या आठवड्यात स्नेहालयाचे विश्वस्त अरुणभाई शेठ यांच्या संकल्पनेतून नगर जिल्ह्यातील गरीब, शेतमजूर, विधवा, परित्यक्ता महिलांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने आटा चक्की चे वितरण करण्यात आले. शेवगाव येथेही या माध्यमातून तीन गिरणीचे वाटप दिनांक 29 सप्टेंबर रोजी स्नेहलता लबडे(आई), रोटरी क्लबच्या उपाध्यक्ष डॉ मनीषा लढ्ढा, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रूपालीताई तडवळकर, वसुधाताई सावरकर व संपूर्ण इनरव्हील परिवाराचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या लॉकडाऊन मध्ये गेल्या काही दिवसांत शेवगाव परिसरात उसाच्या फडात, काट्याकुट्यात इत्यादी ठिकाणी अनौरस बालक आढळून आली. यामुळे स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अहमदनगर यांच्या वतीने अशा बालकांसाठी पाळणा ही लावण्यात आला.जेणेकरून बाल माता बलात्कारित महिला तसेच स्वतःची मुले सांभाळण्याची इच्छा नसलेल्या पालकांची बालके कायदेशीर मार्गाने स्वीकारून दुसऱ्या सक्षम कुटुंबात पुनर्वसित करता येतील. या उपक्रमाच्या वेळी उपस्थित डॉ. मनीषा लढ्ढा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना बाल मातांच्या बाबतीत अनेक कटू अनुभवही सांगितले. तसेच सौ. योगिनी पाटील, स्नेहलता लबडे(आई) यांनी उचल फाऊंडेशनच्या प्रस्तावित मुलींच्या वस्तीगृहाच्या बांधकामासाठी भरीव मदत करण्याचे कबूल केले. यावेळी स्नेहालयाच्या विश्वस्त जयाताई जोगदंड स्नेहालय- स्नेहज्योत प्रकल्पाचे अंबादास शिंदे मामा, संतोष धनवट, उचल फाउंडेशन च्या ऋतुजा सुसे, नीता चव्हाण, राहुल संत, मच्छिंद्र शिंदे, प्रीतम जगताप, स्वाती ढवळे इत्यादी सर्व उपस्थित होते. उचल फाउंडेशनच्या वतीने वसुधाताई सावरकर यांनीमनोगत व्यक्त करत सर्व उपस्थितांचे आभार मानले |