“मनपा, भाजप व दीनदयाळ पतसंस्था या त्रिमुर्तींनी कोविड सेंटरची उभारणी केली आहे. यातून चांगले कार्य निश्चितच होईल. भाजपने आता घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती व प्राथमिक तपासण्यासाठी पुढाकार घ्यावा” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव यांनी केले. महापालिका, नगर शहर भाजप व पंडीत दिनदयाळ पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने नटराज कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
तर, माजी मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘हे कोविड सेंटर सुरू केल्याबद्दल मी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे पदाधिकारी व महापालिकेचे अभिनंदन करतो. या सेंटरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची सेवा दिली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.’
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, वसंत लोढा, लता शेळके, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, सुनील रामदासी, नगरसेवक मनोज दुलम, रविंद्र बारस्कर, उदय कराळे, राहुल कांबळे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, संघटन सरचिटणीस अॅड. विवेक नाईक, महेश तवले, तुषार पोटे, अमित गटणे, अजय चितळे, मनोज ताठे, मल्हार गंधे, शहर अभियंता सुरेश इथापे, कोविड सेंटरचे प्रमुख पी.डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
महापौर वाकळे म्हणाले की, सुरुवातीच्या टप्प्यात 100 बेडचे कोविड सेंटर आम्ही सुरू करत आहोत. यापूर्वीही मनपाने आनंद लॉन, पॉलिटेक्निक कॉलेज येथे कोविड सेंटर कार्यरत केले आहेत. बुथ हॉस्पिटलचा खर्चही मनपाच करत आहेत. नवीन कोविड सेंटरच्या माध्यमातून चांगली सेवा व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोरोना काळात रुग्णांचे मनोबल खचणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.
प्रास्ताविक भैय्या गंधे यांनी केले. सेंटरमधील जेवणाची जबाबदारी पंडीत दिनदयाळ पतसंस्थेने घेतली आहे. तर मेडिकल असोसिएशन मार्फत मोफत औषधे दिली जाणार आहेत. आयुर्वेद व्यासपीठातर्फेही मोफत आयुर्वेदिक उपचार होणार असून, हे सेंटर विनामूल सेवा देणार असल्याचे गंधे यांनी सांगितले.
वसंत लोढा, अभय आगरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अॅड. विवेक नाईक यांनी सूत्र संचालन केले.