आपल्या जिल्ह्यातील तीन सुपूत्र हे मंत्री आहेत. ते काय करतात, हे त्यांना जिल्ह्यातील लोकांनी विचारले पाहिजे. हे मंत्री आतापर्यंत कुठे कोविड सेंटर सुरू करू शकले नाहीत. जिल्ह्यात जो करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यावर ते काही भाष्य करतात, उपाययोजना करतात हे पाहण्यास मिळत नाही. आज बारामतीत जनता कर्फ्यु आहे. स्वतः पालकमंत्र्यांच्या कागलमध्ये लॉकडाउन आहे. मात्र, जिल्ह्याचे खासदार अनेकवेळा लॉकडाउनची मागणी करीत होते. काही कार्यकर्ते सुद्धा लॉकडाउन करा, असे म्हणतात. मात्र हे सरकार केवळ प्रशासनाच्या भरवशावर सुरू आहे,’ अशी टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

 हे सुद्धा वाचा: खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश – महामार्गाच्या कामाकरीता केंद्र सरकारचा निधी मंजुर

     नगरमध्ये भारतीय जनता पार्टी नगर शहर जिल्हा, अहमदनगर महापालिका व पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन विखे पाटील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनोज दुलम, उदय कराळे, पी.डी.कुलकर्णी, वसंत लोढा, वाल्मिक कुलकर्णी, ज्येष्ठे नेते अभय आगरकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर विखे पाटील माध्यमांशी बोलत होते. 

    आज भाजप, पंडीत दीनदयाळ सहकारी पतसंस्था व महापालिकेने कोविड सेंटर सुरू केले. आज अनेक सेवाभावी संस्था पुढे येतात. संघाचे कार्यकर्ते अहोरात्र झटतात. भाजपचे कार्यकर्ते पुढाकार घेतात. सत्ता पक्षातील मंडळी मात्र कुठेच दिसत नाही. महाविकास आघाडी पक्षातील लोकांचे केवळ पब्लिसिटी इव्हेंट चालू आहे. सत्ताधारी पक्षातील मंडळी केवळ मोठमोठे कोविड हॉस्पिटल सुरू केल्याच्या घोषणा करतात. आज त्यांनी घोषणा केल्या, त्याठिकाणी जाऊन पाहिले तर तेथे ना बेडचा पत्ता, ना डॉक्टराचा पत्ता, ना नर्सेचा पत्ता आहे,’ असा आरोपही विखे पाटील यांनी केला.

 

    अपयश झाकण्यासाठी कंगनाचा आधार

अभिनेत्री कंगना राणावत यांनी मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. याबाबत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘राज्यातील करोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठी सरकार कंगनाचा आधार घेत आहे. कंगनाची चर्चा करण्यापेक्षा, या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यापेक्षा सरकारने करोनावर लक्ष देण्याची गरज आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, भाजपचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून थेट शेवटच्या माणसापर्यंत जाऊन करोनाबाबत लोकांना आधार देण्याचे काम करत आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकारचे कुठे अस्तित्व दिसून येत नाही.

….