मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे टीव्ही पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार मा. प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडताना शिवसेनेचे आमदार मा. प्रताप सरनाईक यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी जोरदार टीका केली तसेच शिवसेनेचे मा. अनिल परब यांनीही या बद्दल संताप व्यक्त केला.

 

प्रताप सरनाईक यांनी नियम २०३ अन्वये विशेषाधिकारभंगाचा प्रस्ताव आज विधानसभा अध्यक्षासमोर मांडला. प्रस्तावाबाबत बोलताना मा. प्रताप नाईक म्हणाले सुशांत सिंग केसच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिक टीव्ही वरती होणाऱ्या चर्चेमध्ये अर्णव गोस्वामी हे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तसेच इतर मंत्री यांचा वारंवार चुकीच्या पद्धतिने उल्लेख करत असून, त्यांनी या लोकशाहीची थट्टा चालवली आहे.सध्या टीआरपी च्या स्पर्धेमध्ये पुढे राहण्यासाठी टीव्ही वाहिन्या चर्चा करताना मा. मुख्यमंत्री, लोकसभेचे सदस्य तसेच राज्यसभेचे सदस्ययांचा उल्लेख चुकीच्या पद्धतिने करीत आहे.

 

    तर विरोधीपक्ष नेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रस्तावावर भाष्य  करताना म्हटले, मुख्यमंत्रीयांचा एकेरी उल्लेख करणे आम्हाला मान्य नाही, परंतु या बाबत सर्वांना साठी एकच भूमिका ठेवावी, सरकारची जी भूमिका आज रिपब्लिक बाबत आहे, तीच भूमिका त्यांनी सामना बद्दल पण ठेवावी, सामना मध्ये पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख होतो परंतु त्या बद्दल वेगळी भूमिका असते, अशी दुपट्टी भूमिका घेणे हे देखील आम्हाला मान्य नाही.