करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगर जिल्हा परिषद मुख्यालयात कर्मचार्‍यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. जि.प.सभागृहात यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. जि.प.अध्यक्षा राजश्री घुले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती सुनिल गडाख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, साथरोग अधिकारी दादासाहेब साळुंके, जि.प.कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, सचिव किशोर शिंदे, शिवाजी भिटे यांनी सभागृहात येवून चाचणी व्यवस्थेची पाहणी केली.

    अध्यक्षा राजश्री घुले म्हणाल्या की, जिल्हा परिषदेत करोनाचा फैलाव वाढू नये यासाठी कर्मचारी संघटनेने केलेल्या मागणीनुसार करोना चाचणी करण्यात आली आहे. करोनाच्या संशयामुळे प्रत्येक जण दबावाखालीच कामावर येत आहे. आता करोना चाचणीमुळे हा दबाव कमी होण्यास मदत होईल. करोना रोखण्यासाठी जिल्हा परिषदेची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. यापरिस्थितीत प्रत्येकानेच योग्य प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

    प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यालयात काम करणारांमध्ये संशयाचे वातावरण होते. जि.प.कर्मचारी युनियनने सातत्याने सर्वच कर्मचार्‍यांची करोना चाचणी करून घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने आवश्यक व्यवस्था करून सर्वांची करोना चाचणी करून घेतली आहे. त्यामुळे आता कर्मचार्‍यांमधील भिती कमी होवून ते निर्धोकपणे आपले कर्तव्य बजावू शकतील.

हे वाचा:

पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात महाराष्ट्र विधानसभा

विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव.

    उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, कर्मचारी युनियनच्या मागणीनुसार करोना चाचणीसाठी किट उपलब्ध होताच आज चाचण्यांना सुरुवात केली. करोना चाचणीच्या अहवालामुळे कर्मचार्‍यांमध्ये असलेली भिती दूर होण्यास मदत होईल. महाराष्ट्रात अशा प्रकारे टेस्ट करणाऱ्या जिल्हा परिषदे पैकी दोन-तीन जिल्हा परिषद पैकी नगर एक आहे  प्रशासनाला बाहेरील पॉझिटिव्ह केसेस प्रमाण 30 टक्के असल्यामुळे आज आकडा 100 पार होतो की काय अशी भीती वाटत होते मात्र कर्मचारी यांनी काळजी घेतल्यामुळे ते प्रमाण कमी झाले व ते सुद्धा लवकरच काळजी घेतील आणि बरे होतील.

जि.प.कर्मचारी युनियनचे अध्यक्ष विकास साळुंके यांनी सांगितले की, कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा परिषदेतही काही अधिकारी, कर्मचारी बाधित झाले. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यालयात काम करताना आपण सुरक्षित आहोत की नाही अशी भिती प्रत्येकाच्या मनात आहे. यापार्श्वभूमीवर युनियनने सर्वच कर्मचार्‍यांची चाचणी होण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यालयातील सुमारे 250कर्मचार्‍यांची अँटीजेन तपासणी करण्यात आली आहे.

दिवसभर चाललेल्या तपासणीअंती एकूण कर्मचार्‍यांपैकी  ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर उर्वरित सर्व कर्मचार्‍यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.