कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत. आपत्कालिन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० ड्युरा सिलेंडर आणि २०० जम्बो सिलेंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
           रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी राज्य शासनामार्फत उपाय योजना करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी राष्ट्रीय ऑक्सीजन उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा करून राज्याला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
           राज्याची ऑक्सिजनची गरज ४०० मेट्रिक टन एवढी असून उत्पादन क्षमता १०८१ मेट्रिक टन आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर १७ हजार ७५३, बी टाईप सिलिंडर- १५४७, डयुरा सिलिंडर- २३०, लिक्विड क्रायोजनिक ऑक्सिजन टँक्स १४ असून आणखी १६ ठिकाणी काम सुरु आहे.
           जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पावसाळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंट्रोल रुमकडे ऑक्सिजन पुरवठा याबाबतही जबाबदारी देण्याचे निश्चित करण्यात आले असून हा कंट्रोल रूम ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सुरू राहतील. राज्यस्तरावर अन्न व औषध प्रशासनाला मार्फत कंट्रोल रूम सुरू करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२६५९२३६४ आहे. तर टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ असा आहे.

आणखी बातम्या

निवडणूक आयोगाकडून गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील प्रकाशित करण्यास सुधारित मार्गदर्शक सूचना जारी.

कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत

राज्य सरकारने राज्यातील सामान्य जनतेचे २४० कोटी रुपये परत द्यावे.

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७९ टक्के