लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीचं डोकं भिंतीवर आपटल्यानंतर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली प्रवरा येथे घडली. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
           देवळाली प्रवरा येथे एका तरुणाने प्रेयसीच्या घरात घुसून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करून, पिस्तुलातून स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. विक्रम उर्फ विकी मुसमाडे (वय २६, रा. देवळाली प्रवरा) असे या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत विक्रम मुसमाडे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लोणी येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेत संबंधित तरुणी किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
           विक्रम मुसमाडे याचे त्याच्या गावातील एका मुलीवर प्रेम होते. ही मुलगी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. ती मुलगी आजी व लहान बहिणीबरोबर राहते. आज पहाटे साडेपाच वाजता एका मित्र व विकीने मुलीच्या घराच्या मागील भिंतीवरून तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी मुलगी स्वयंपाक घरात होती. मुसमाडे हा थेट स्वयंपाक घरात गेला. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न कर, असे त्याने मुलीला सांगितले. त्यावर मुलीने लग्नास नकार दिला, त्यामुळे दोघांमध्ये झटापट व बाचाबाची झाली रागाच्या भरात मुसमाडे याने मुलीचे डोके भिंतीवर आपटले. त्यामुळे मुलगी जमीनवर कोसळली. लगेच मुसमाडे याने कमरेचे पिस्तुल काढून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. जखमी अवस्थेत मुलीने तिच्या काकांना फोन करून घटनेची माहिती दिली. तर, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुसमाडे याला त्याच्या मित्रांनी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेले. तसेच या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या संबंधित मुलीला राहुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
           दरम्यान, घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळावर मुसमाडे याने गोळीबार करण्यासाठी असणारे पिस्तुल आढळून आले असून ते पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आठवड्यात रूग्ण संख्येत ४९९३ ने वाढ

करोनाचे पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून ४८००० रुपयांचा ऐवज लुटला

विदर्भातून विदेशात सहज होणार संत्र्याची निर्यात.

पद्म पुरस्काराच्या ऑनलाईन शिफारशीसाठीची आज अंतिम तारीख.