कोविड-१९ अर्थात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपायययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि कोवीड बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीचा वापर करण्यात येत आहे. जनजागृतीच्या माध्यमातून मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी- गर्दीच्या ठिकाणी संपर्क टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा प्रबोधनात्मक माहितीवर भर देत नागरिकांना त्याचे महत्व पटवून देण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीत जनजीवन पूर्वपदावर येत असताना कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आता राज्य शासनाने माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर सुरु केली आहे. दिनांक १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत ही मोहिम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. लोकसहभाग, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी-सदस्य, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय यंत्रणा आदींच्या माध्यमातून ही मोहिम राबविली जाणार आहे. प्रत्येकाचा या मोहिमेत असणारा सहभाग हे कोरोनाला पराभूत करण्यासाठीचे पहिले पाऊल ठरणार आहे.
           ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरु असताना, जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच कोवीड प्रादुर्भावावर नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला २ वेळा घर भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश, संशयीत कोवीड रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्त्वाच्या को-मॉर्बिड स्थिती असणाऱ्या व्यक्तीन शोधून काढणे, त्याचप्रमाणे बालकांचे लसीकरण व गरोदर मातांवर वेळीच उपचार याचा अंतर्भाव या योजनेत आहे.
           या मोहिमेत कुटुंब हा घटक मानून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही मोहीम जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्र, सर्व नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायती ते अगदी वाडे, तांडे, पाडे आदींपर्यंत पोहोचून नागरिकांची तपासणी करणार आहेत. दिनांक 15 सप्टेंबर ते दिनांक 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ही मोहिम दोन फेऱ्या मध्ये जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
           गृहभेटीद्वारे संशयीत कोवीड तपासणी व उपचार, अति जोखमीचे (Co-morbid) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोवीड-१९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, सारी आणि रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोवीड-१९ तपासणी आणि उपचार आदींवर या मोहिमेत भर असणार आहे. मोहीमेची पहिली फेरी दि.१५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये होईल आणि दुसरी फेरी दि.१४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर, २०२० या कालावधीमध्ये होईल. पहिला फेरीचा कालावधी १५ दिवसांचा असेल तर दुसऱ्या फेरीचा कालावधी १० दिवसांचा राहणार आहे.
           जिल्हाधिकारी यांच्या सनियंत्रणाखाली ही मोहिम राबविली जाणार आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य विभागाच्या सहकार्याने त्यासाठीचे नियोजन करण्यात आहे आहे. शहरी भागात जिल्हा शल्य चिकित्सक, ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी हे मोहिम संनियंत्रणाची जबाबदारी पार पाडणार आहेत. नियोजनासाठी महानगरपालिका/नगरपालिकांमध्ये नागरी प्रा.आ.केंद्र आणि ग्रामीण भागामध्ये प्रा.आ.केंद्र केंद्रस्थानी धरुन मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत समाविष्ट नसलेल्या लोकसंख्येचे वॉर्डनुसार नियोजन करण्यात आले आहे.
           गृहभेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी आणि २ स्वयंसेवक (एक पुरुष व एक स्त्री) असे तिघांचे पथक असणार आहे. एक पथक १ दिवसात ५० घरांना भेटी देईल. एकूण पथकांची संख्या आणि स्वयंसेवक ठरल्यानंतर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पथकास लोकसंख्येनुसार गाव निश्चित करुन प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे.
           पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी किंवा आशा आणि २ स्थानिक स्वयंसेवक (१ पुरुष व १ स्त्री) असतील. हे स्वयंसेवक स्थानिक सरपंच, नगरसेवक यांनी निश्चित केलेले असणार आहेत. या पथकातील सदस्यांना कोरोना दूत असे संबोधले जाणार आहे. बहुविध आरोग्य सेविका (स्त्री-ए.एन.एम.), बहुविध आरोग्य सेवक (पुरुष-आरोग्य सेवक), आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती (आवश्यवकतेनुसार महिला व बाल कल्याण विभागांची परवानगी घेऊन), किमान १० वी पास कोविड दुत (स्वयंसेवक) – प्रत्येक पथकात १ पुरुष व १ स्त्री, इतर कर्मचारी (उपरोक्त मधून पुरेसे कर्मचारी उपलब्ध झाले नाही तर) आणि प्रत्येक ५ ते १० पथकामागे १ डॉक्टर (वैदयकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र, प्रा.आ.पथक किंवा समुदाय आरोग्य अधिकारी) आदींचा सहभाग या मध्ये राहणार आहे.
           कोरोनाला रोखणे ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकानेच या मोहिमेत त्यांचा सहभाग देणे आवश्यक आहे. पथकातील सदस्य सर्वेक्षणावेळी इन्फ्रारेड थर्मामिटर, पल्स ऑक्सीमीटर च्या साह्याने नागरिकांची तपासणी करतील. त्याशिवाय, त्यांची नोंद करुन घेतील.
           सर्वेक्षण मोहीमे दरम्यान पथकातील सदस्यांनीही सतत मास्क परिधान करणे आवश्यक आहे. दोन घरांच्या भेटी दरम्यान हात साबणाने धुवावेत किंवा सॅनिटायझरने निर्जतुक करावे, शक्य तो मोकळया हवेशीर जागेमध्ये माहीती भरावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
           गृहभेटीवेळी प्रत्येक घरात शिरण्यापूर्वी दाराबाहेर सोयीच्या ठिकाणी सॅनिटायझर लावण्यात यावेत. घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक सदस्याची ऍपमध्ये नोंद करण्यात येईल. त्यानंतर तापमान आणि ऑक्सीजनचे प्रमाण मोजून ते नोंदविण्यात येईल. ताप असलेली व्यक्तीय आढळल्यास (तापमान -९८.0F) अशा व्यक्तीस खोकला, घशात दुखणे, थकवा इ. लक्षणे आहेत का याची माहिती घेतली जाईल. घरातील प्रत्येकास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनी आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा इ. आजार आहेत का याबाबतमाहिती घेऊन त्या माहितीची नोंद ऍपमध्ये केली जाईल.
           तपासणीवेळी एखाद्या व्यक्तीचा ताप १००.४ अंश फॅरनहाईट इतका किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सीजन प्रमाण 95 टक्के पेक्षा कमी असल्यास हे पथक त्या व्यक्तीस जवळच्या फीवर क्लिनीक किंवा कोविड केअर सेंटरमध्ये संदर्भित करेल, संदर्भीत करताना रुग्णास संदर्भ चिठ्ठी देण्यात यावी तसेच कोवीड-१९ प्रतिबंधाचे सर्व संदेश रुग्ण व घरातील सर्व नातेवाईकांना हे पथक देईल. घरातील सर्व व्यक्तींची तपासणी पूर्ण झाल्यावर दारावर असलेल्या त्याची नोंद करुन हे पथक पुढील घरास भेट देईल. अशाप्रकारे पहिली फेरी पूर्ण होईल.
           गृहभेटीच्या दुसऱ्या फेरीत कुटुंबातील सदस्यांची माहीती पहिल्या फेरीत घेतलेली असल्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये दररोज ७५-१०० घरांचे सर्वेक्षण करण्यात येईल. दुसऱ्या फेरीमध्ये हे पथक तपासणीसाठी गेलेल्या घरातील सर्व व्यक्तींचे तापमान आणि ऑक्सीजन प्रमाण तपासेल. दरम्यानच्या काळात घरातील कोणाला मोठा आजार होऊन गेला का याची खात्री करेल.
           मोहीमेमध्ये सहभागी होणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे, स्वयंसेवकांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून काही ठिकाणी ते घेण्यात येत आहे. त्यानुसार अँपचा उपयोग गृहभेटी, गृहभेटीची नोंद, कुटुंबाची माहिती आदी बाबींचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येत आहे.
          मोहिमेच्या कालावधीत या तपासणीदरम्यान, नागरिकांना कोरोनापासून बचावापासून काय काळजी घ्यावी, याचीही माहिती दिली जात आहे. सतत मास्क घालून रहावे. मास्क शिवाय घराबाहेर पडू नये. दर २-३ तासांनी साबणाने स्वच्छ हात धुवावेत. हात धुण्याची सोय नसलेल्या ठिकाणी (उदा.प्रवासात) सॅनिटायझरचा वापर करावा. नाक, तोंड, डोळे यांना हात लाऊ नये. ताप आल्यास तसेच सर्दी/खोकला/घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी. मधुमेह, हृदयविकार, किडणी आजार, लठ्पणा आदी असल्यास दररोज तापमान मोजावे व तापमान ९८.७ F (३७०C) पेक्षा जास्त आढळल्यास तपासणी करुन घ्यावी. सध्या असणाऱ्या आजारावर सुरु असलेले उपचार सुरु ठेवावेत. त्यात खंड पडू देऊ नये, डॉक्टरांकडून नियमित तपासणी करुन घ्यावी. कोवीडमुळे होणारी गुंतागुंत व मृत्यू टाळण्यासाठी ताप, खोकला, दम लागणे इ. लक्षणे आढल्यास त्वरीत कोवीड चाचणी केंद्रात जाऊन कोवीड-१९ चाचणी करुन घ्यावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करावेत. घरच्या घरी उपचार घेऊ नयेत.
           कोवीड बाधित व्यक्तींनीही घरी गेल्यानंतर सतत मास्क लावावा. खोलीच्या / घराबाहेर पडू नये. दर २ तासांनी स्वच्छ हात धुवावेत. स्वत्रंत टॉयलेट / बाथरुम जेवणांची भांडी वापरावीत. कपडे स्वतंत्रपणे धुवावेत. ताप आल्यास / थकवा जाणवू लागल्यास त्वरीत रुग्णालयात जावे. कोवीड होवून गेलेले व्यक्ती् (रुग्णालयातुन येवुन ७ दिवस घरी आयसोलेशन पुर्ण झालेलया व्यक्तीं नी पण कोवीड आजार होवून गेला तरीही स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.)
           माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहमेसाठी जनतेचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनधी, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था आदींनी यात सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. आपण प्रत्येकानेच यात सहभाग नोंदवला तर कोरोनाला नक्कीच पराभूत करु शकू. चला तर मग, आपण आपली जबाबदारी पार पाडू या. कोरोनाला पराभूत करु या!
          
   (स्त्रोत:जिल्हा माहिती कार्यालय, अहमदनगर)

आणखी बातम्या

दि १६.०९.२०० ते १८.०९.२०२० या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा.

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथक नियुक्त.

पद्म पुरस्काराच्या ऑनलाईन शिफारशीसाठीची आज अंतिम तारीख.

लग्नासाठी नकार, गोळी झाडून आत्महत्याचा प्रयत्न.