अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अखेर राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची निवड झाली. वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानुसार अखेर शिवसेनेनेचे उमेदवार मा. योगीराज गाडे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. यामुळे राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.
आज जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री मा.बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे सचिव मा.मिलिंद नार्वेकर यांच्या बैठकीत राज्यात सगळीकड़े स्थानिक स्तरावरही महाविकास आघाडी करण्याचे ठरवले गेले होते. आता हळूहळू तिन्ही पक्षांचे नेते व समर्थक स्थानिक स्तरावर एकत्र येत असून, त्याची सुरुवात स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे कोतकर यांच्या निवडीतून झाली आहे. आता आम्ही सर्वजण समन्वयाने एकत्र काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याची सुरुवात आज झाली. यापुढे ती अधिक बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात येतील.
दरम्यान, येणाऱ्या काळात महापौरपद शिवसेनेला देण्याबाबत निर्णय झाला काय, या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री गडाख यांनी सांगितले ‘आता स्थानिक स्तरावर एकत्र येण्यास आमची सुरुवात झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीस अजून बराच वेळ आहे. पक्ष वाढवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे आपापल्या परीने प्रयत्न सुरू असतात, योग्य वेळ आल्यावर त्यावर निर्णय होईल. तो पण निर्णयही तिन्ही पक्षांच्या समन्वयातूनच होईल’.
आजच्या निर्णयानंतर नगरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे मनोमिलन करण्यात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना यश आले आहे. गडाखांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर नगर शहरात ही नवी राजकीय सुरवात झाल्याचे आता दिसत आहे. भाजपाने महापौर निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील असलेल्या टोकाच्या मतभेदाचा फायदा घेऊन आपला महापौर केला होता. आता मंत्री गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नगरची जबाबदारी स्वीकारली, त्याचा परिणाम आज मनपा स्थायी समितीच्या निवडणुकीत दिसला आहे.