(अहमदनगर -अनिरुध्द तिडके)
           अहमदनगर महापालिकेत शिवसेनेने दिलेला शब्द पाळल्याने भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या श्री. मनोज कोतकर यांची स्थायी सभापतिपदी निवड झाली. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार मा. संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांचे पत्र लिहून आभार मानले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीशी असलेले मतभेद मिटविण्याचे काम आता शिवसेनेत नव्याने दाखल झालेले जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख करीत आहेत.
          मागील बैठकीत गडाख यांनी आगामी महापाैर शिवसेनेचाच होईल, असा दावा केला होता. आता काल झालेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने घेतलेली माघार हा या रणनीतीचाच एक भाग असल्याचे मानले जाते. महापालिकेत सध्या शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ सर्वाधिक आहे. असे असताना पहिल्या टर्म मध्ये त्यांचा महापाैर झाला नाही.महापालिका निवडणुकी नंतर शहरातील शिवसेनेचे तत्कालीन नेते व राष्ट्रवादीचे नेते यांच्यात मतभेद होते, त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी राजकीय खेळी करीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला व भाजपाच्या गळ्यात महापाैर पदाची माळ पडली.
           महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी अंमल मात्र राष्ट्रवादीचाच आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात शहरात होतच राहते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे या पक्षाची युती राज्यभरातील लहान-मोठ्या निवडणुकांतही दिसून आली. याचेच प्रत्यंतर नगरच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीतही काल दिसून आले. महाविकास आघाडीत शिवसेना व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते समन्वयाने काम करतात. त्यामुळे त्यांच्या आदेशाने नगरमध्येही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेचा नगरसेवक स्थायी समितीचा सभापती होऊ शकला असता. परंतु राष्ट्रवादीने तसे न करता भाजपचा नगरसेवक फोडून त्याला उमेदवारी दिली. त्यानंतर शिवसेनेने माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे मनोज कोतकर स्थायीचे सभापती झाले.
           यातून आगामी काळात शिवसेनेला महापाैरपद मिळावे, यासाठीच स्थायीचे सभापतिपद राष्ट्रवादीकडे देऊन शिवसेनेने खेळी खेळली आहे, असे मानले जात आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदाचा विषय थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेला होता. त्यांच्या आदेशानेच शिवसेनेने माघार घेतली. शिवसेनेचे नगरसेवक जास्त असल्याने आगामी काळात महापाैर निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापाैर होईल, असाच अर्थ कालच्या घडामोडीचा होतो. दरम्यान, अहमदनगरचे महापाैरपद हे अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. अशा प्रकारचा उमेदवार शिवसेनेकडे आहे. रोहिणी संजय शेंडगे या शिवसेनेच्या उमेदवार महापाैरपदाच्या दावेदार होऊ शकतात. त्यामुळे आगामी काळात अहमदनगर महापालिकेचा पुढचा महापाैर हा शिवसेनेचा होईल अशी चर्चा सध्या सुरू आहे.

आणखी बातम्या

अहमदनगर मनापा स्वीकृत सदस्य निवड, ऑनलाईन पध्दतीने होणार सभा.

मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, छत्रपती युवा सेनेचे तहसीलदार नेवासा यांना निवेदन..

मा. आ. अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन.’